Monday, January 23, 2006

आनंदाचे झाड

या क्षणी माझ्यासमोर एक पांढराशुभ्र, गुळगुळीत, नितळ कोरापान, कागद आहे. शाई भरलेले माझे आवडते, सरावाचे पेन आहे. मुख्य म्हणजे मला भरपूर निवांत वेळ आहे. डोक्यात नाना प्रकारच्या कल्पनाही उचंबळत आहेत. मग लिहायला विलंब का? कागदाला पेन टेकण्याचा अवकाश, मनात येईल ते मी या कागदावर लिहू शकेन.

पण हा विचार मनात येतो न येतो तोच त्याच्या पाठोपाठ दुसरा विचार तितक्याच वेगाने येऊन थडकतो. मी लिहायला हवेच का? कागद नि पेन पुढ्यात मिळाले, की काहीतरी लिहावेसे वाटणे ही लेखक जमातीतल्या लोकांच्या मनात खोलवर रुजलेली एक विक्रुती तर नसेल? हा इतका शुभ्र, तलम, नितळ गुळगुळीत कागद. खरे तर हा नुसताच बघावा. या पांढऱ्याशुभ्र, निर्मळ प्रवाहात डोळे अलगद सोडून द्यावेत, या तलम प्रुष्ठभागावरून हळुवार बोटे फिरवावीत. त्याचा मऊ स्पर्श अंगाअंगात भिनवून घ्यावा. हा कोरा करकरीत कागदी वास खोलवर हुंगावा. त्रुप्तीचा निःश्वास टाकावा.

खरोखर कागद पाहून मनाची होणारी प्रतिक्रिया अधिक स्वाभाविक नव्हे का? ही स्वाभाविक व्रुत्ती सोडून कागद दिसला रे दिसला, की तो चिताडण्याची अस्वाभाविक व्रुत्ती माणसात आली कशी? कुठून आली?

हे जर खरे, तर मला तरी लिहिण्याचा संकोच का वाटावा? अनेकदा मनात येते, लिहायचे कशासाठी? हे वाचणार कोण? याचे महत्त्व केवढे? केवळ आपल्या क्षणभंगूरतेची सलणारी जाणीव विसरावी, कशाच्या तरी द्वारा मरणानंतर चार दिवस जगात उरावे, इतरांच्या थोडेफार आठवणीत राहावे, म्हणून तर आपण हा लेखनप्रपंच करीत नसू? ही मानसिक विक्रुती नसून ती आपली एक आंतरीक गरज तर नसेल? तसे असेल तर या गरजेची इतकी लाज का वाटावी? माणसाच्या अंगी अनेक प्रकारचा दुबळेपणा आहे. त्यांतलाच हाही एक दुबळेपणा असेल. तर मग तो स्वीकारून मनोमन त्याची जाणीव बाळगून, जमेल तसे, न जमेल तसेसुद्धा लिहायला हरकत काय?

मग मनात कल्पना दाटून येतात, शब्द कानांत कुजबुजतात, गुणगुणत राहतात, ते द्रुश्य रुपाने मला खुणावीत माझ्याभोवती फेर धरतात; लिहावेसे वाटते. लिहावेसे वाटते.

- शांता शेळके "आनंदाचे झाड"

No comments: