हवेतला चिंब गारवा, मनात उत्साह उभारे,
झुळूक वाऱ्याची शीतल, आणखी तुषार फवारे.
इवल्या इवल्या कळ्यांची, झाली कधीच फुले,
कुठे काटेरी गुलाब मोहक, दव-मोत्याने खुले.
नदिची अखंड खळखळ-झुळझूळ, मजला साथ ती करे.
निळा निळा आसमंत सारा, कोवळ्या फुलांसी विचारे,
"काय शोधतसे हिरवाईत इथे,कोण हा वेडा बरे?
अपुल्याच कोषात मग्न तो, फुलांस करी इशारे?"
ही तांबडी-ती पिवळी-आणि गुलाबी, गर्द जांभळे तुरे,
रंग छटा किती वर्णू मी, पडती शब्द अपुरे.
फुले छोटी इवली नाजूक, वन वन सजले सारे,
लुटत मोद मनी आज मी, स्वच्छंद रानी विहरे.
फेसाळती निर्झर, उच्छ्ल नद्या आणि शुभ्र हिमशिखरे,
सारी फुले इथे समोर माझ्या, परंतु मन माझे झुरे,
आनंद या वातावरणातला, पोहोचवतील का हे वारे,
फुलास त्या माझ्या, तुजविण गं अपूर्ण हे सारे.
No comments:
Post a Comment