Wednesday, April 06, 2005

नतमस्तक

नतमस्तक होण्याचा आजचा दिवस होता.

मला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे व्यसन लागून आता तसा बराच काळ लोटला आहे. खरं वेड लागलं, मी पं. राजन-साजन मिश्रांचा दुर्गा ऐकला तेव्हा. सुरांचा नितांतसुंदर धबधबा म्हणजे काय असतं हे मला तेव्हा कळलं. त्या वर्षावात मी जो वाहावत गेलो आहे ते आजपर्यंत!

पंडितजी द्वयींची मैफिल याची देही याची काना ऐकाया मिळावी याहून चांगली गोष्ट काय असावी?

सभाग्रुहात पोहोचलो तेव्हा तानपुऱ्याचे सूर केव्हाच भरून राहिले होते. पंडितजी मैफिलीआधीचा रियाज करीत असावेत. वेळेआगोदर जाउन जागा पटकावण्याचा माझा हेतू सफल झाला आणि खऱ्या मैफिलीआधीच पंडितजींनी माझ्यावर राज्य करायला सुरुवात केली.

तलम कुर्ता, खानदानी धोतर आणि ओठांवर स्मित घेउन पंडितद्वयी मंचावर स्थानापन्न झाली. मखमली शब्दांत IISc चे कौतुक करून आम्हांस संगीतपूजेत सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले. संध्याराग मधुवंती आणि किरवाणी गाणार असल्याची माहिती देऊन त्यांनी मग षड्ज लावला.

त्यानंतरचे जवळजवळ दोन तास मी जे काही अनुभवले त्याबद्दल लिहून मी ताजमहालास विटा लावण्याचा अपराध करणार नाही. ती नजाकत, ती सहजता, ती अधिकारवाणी, तो वाणीवरचा अधिकार, ती स्वरांची चढाओढ. ती जुगलबंदी. वाह!

प्रत्यक्ष ऐकलेली मैफिल आणि ध्वनिमुद्रिका यांत जमीन-आस्मानाचा फरक असतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. बनारसच्या एखाद्या पर्णकुटीतील योग्याच्या चेहऱ्यावरचे तेज आम्हास दिसत होते. गायकीतला अमर्याद आनंद आणि अवर्णनीय समाधान पंडितजी आम्हाला भरभरुन देत होते आणि आम्ही पामर आमच्या मर्यादित श्रवणशक्तीने त्यांचे हे दान अधाशीपणाने पदरात पाडून घेत होतो. कित्येक अवसर असे आले की हार्मोनियमचा साथीदार अवाक होउन 'सा' वर खिळून रहावा. पंडितजींच्या मिस्कील हास्यानंतर मग सावरून त्यानेही मग तोडीचे सूर काढावेत!

कार्यक्रमाच्या समारोपी कबीराचे भजन पंडितजींनी जिवंत केले. भजनाचे सार सांगतांना मिश्राजींच्या वाक्प्रतिभेने आम्हांस मुग्ध करून टाकले. काय वर्णावा तो गोडवा भाषेतला!

खरोखर. नतमस्तक होण्याचा आजचा दिवस होता.