Thursday, March 24, 2005

नका दु चेण्या पका सके

डोक्यावरचा भार असह्य झाला आणि मी शरण गेलो - थेट White Horse Cutting Salon, ऊर्फ पुरुषांच्या beauty parlour ला. सकाळचा पहिलाच गिर्हाइक होतो - भवानी अजून व्हायचीच होती.

कर्तनकाराने मोठ्या श्रद्धेने भिंतीवरच्या वेंकटेश्वराला नमस्कार केला. त्याच्या चेहर्यावरचे धाकधुकीचे भाव पाहून मग मीही वेंकटेश्वरापुढे नम्र झालो. एकदा कात्रीची किटकिट सुरु झाली की मग माघार नाही.

White Horse हे काही नामांकित ठिकाण नाही. कित्येकदा मित्रांच्या फसलेल्या हजामती पाहून मी पोट दुखेपर्यंत हसलेलो आहे. पण campus मध्ये असलेले एकमेव केस कापण्याचे दुकान आणि स्वस्त दर यामुळे मी White Horse वर आरूढ होतोच. समोर प्रचंड आरसा माझेच मुखकमल मलाच दाखवत असतो, त्यामुळे नाईलाजाने तेच पहावे लागते. आधुनिक कर्तनालयांमध्ये आजकाल TV ची सोय केलेली असते. माझ्या मते गिर्हाइकाची दिशाभूल करण्याचा तो एक मार्ग आहे! सतत आरशावर नजर असली की मग कटिंगवालाही शिस्तीत काम करतो. "एकदम short" असं सांगितल्याशिवाय कुठल्याही दुकानात फारसे कष्ट घेतले जात नाहित. लहानपणी एकदा तर आईने मला cutting करून आल्यानंतर "आता पुन्हा एकदा जाउन ये रे बाबा" अशी धमकी दिल्याचं आठवतं. मी मात्र अशा ठिकाणी मौनव्रत स्विकारतो.

रिकामे न्हावी सतत चांभारचौकश्या करत असतात. "आप कहा से है?" असं विचारल्यावर मी "नाशिक, महाराष्ट्रा से" असं म्हणालो. मला अपेक्षा नव्हती की त्याला बिचाऱ्याला ठाऊक असेल की नाशिक कुठे आहे. तसं विचारताच म्हणाला, "हा, हमे पता है!". अशाच चौकशीतून त्याला आधी कधितरी हे द्न्यान प्राप्त झालेले असावे. अशा काही संवादांचे विश्राम सोडले तर ते उच्चासन विचारप्रवर्तक असते.

माणूस कितीही मोठा झाला तरी तो आपल्या आई-वडिलांसाठी कुठल्याही orders स्विकारण्यासाठी तयार असतो. आणि त्यानंतर कदाचित कर्तनकाराचा नंबर येत असावा - "...मान खाली करा... हं, आता वर करा, मग डावीकडे..." या आद्न्या पाळाव्याच लागतात :)