Friday, March 18, 2005

सुखी राजपुत्र

कोणे एके काळी । वसे अद्भुत नगरी ।
राजकुमाराचा पुतळा सोन्याचा । उठून दिसे ॥

सुखी राजकुमार । मंडळी कथती ।
राजधानीची शान । जगती वाढवे ॥

सोन्याचे शरीर । माणिक डोळ्यांत ।
राजबिंडा तरूण तो । असे हाती तलवार ॥

ताऱ्यांनी डवरली । रात्र एक रम्य ।
शुभ्र छान बगळा । आकाशी रमे ॥

नदीशी खेळत । वाऱ्याशी झुंजत ।
स्वच्छंद तो बगळा । विहार करे ॥

थकून भागून । अखेर शेवटी ।
बगळ्याचा जोष । केवळ मनी उरे ॥

विश्रांतीसाठी मग । शोधता निवारा ।
राजपुत्राचा पुतळा । मनात भरे ॥

डोळ्यास लागता । बगळ्याचा डोळा ।
अचानक एक । थेंब त्यास जागवे ॥

पाहता आकाशी । साक्षात राजपुत्र ।
आसवे गाळता । बगळ्यास दिसे ॥

सुखी राजपुत्रा । तू का रडावेस ।
पुसे बगळा तेव्हा । राजपुत्र वदे ॥

जाणलो न कधी । मी आसवांची दु:खे ।
राजवाड्यात भव्य । केवळ सम्रुद्धी नांदे ॥

शब्दन शब्द माझे । चाकर झेलती ।
सोन्यांच्या भिंती । आणि मोत्याच्या राशी ॥

पलिकडचे जग । नाही कधीच जाणलो ।
सुखातच सोडले जग । सुखाचेच सारे आयुष्य ॥

आता उच्चासनी । बसलो इथे तेव्हा ।
जगाचे दारूण दारिद्र्य । कुरुपता खुपे ॥

दूर दूर पलिकडे । असे छोटेसे झोपडे ।
तरूण लेखक । भुकेपायी रडे ॥

माझिया माणकांचा । उपयोग घडावा ।
लेखका उमद्या । नेऊन देशील का तयाला ?

तलवारीची शान । असे ते माणिक ।
बगळा पोहोचविता त्यास । शान आणखी वाढे ॥

असेच दिवस । रात्री आणि जाती ।
बगळा आणि । राजपुत्राची अनोखी ती मैत्री ॥

सोन्याचे शरीर । आता न उरे त्याचे ।
हिरावता हिरे । डोळ्यांचा प्रकाशही सरे ॥

सुखी राजपुत्र । बगळ्याच्या डोळ्यांतुनि पाही ।
समाधान दानाचे । भग्न शरीरी असे ॥

कठोर उन्हाळा । अंगाची करे लाही ।
बगळा मात्र निर्धार । मनाचा करे ॥

एके दिवशी तप्त । कथे बगळा राजपुत्रास ।
निरोप मजला । आता तू द्यावास ॥

उष्मा न होई सहन जीवास । परी मनात आनंद याचा।
की चरणी राजा तुझ्या । मला मरण यावे ॥

त्याच दिवशी प्रधान । पुतळ्याकडे पाहता ।
अवशेष राजपुत्राचे । बगळयाचे आणि त्यास दिसती ॥

अरे रे! पुतळ्याचे वैभव । नुरले आज ।
आणि बगळ्याचा म्रुत्यू । नसे लक्षण चांगले ॥

आता दुसऱ्या पुतळ्याचे । प्रयोजन करावे ।
वितळवून टाकावे । सुखी राजपुत्रा ॥

अहा हा पण । सांगतो आश्चर्य केवढे ।
उरलेले ह्रुदय कुमाराचे । तेवढे न वितळे ॥

फेकून देता ह्रुदय । ते अमर ।
बगळ्याच्या म्रुत । शरिराजवळ पडे ॥

दूतांनो मजला । द्या आणून गोष्टी दोन ।
जाणता तुम्ही । जयांना अजोड ॥

वदता परमेश्वर । दूत त्याचे जाणती ।
गोष्टी राजधानीत । अमूल्य दोन असती ॥

राजपुत्राचे ह्रुदय । शरीर अन बगळ्याचे ।
पाहता परमेश्वर । प्रसन्न वदनी हसे ॥

राजपुत्राला अखेर सुख । मनी लाभे ।
परमेश्वराच्या दरबारी । ह्रुदय त्याचे हसे ॥

कथा ही त्यागाची । आणि बलिदानाची ।
असे का हा सुखाचा मार्ग ? अजित म्हणे ॥


Oscar Wilde च्या "The Happy Prince" वरुन स्वैर.