Tuesday, February 22, 2005

रंगपंचमी!

रात्री झोपायला उशीर होत नसल्यामुळे सकाळ कशी प्रसन्न उगवते! सकाळी वातावरणात थोडासा गारवा असतो. balcony तून छान थंडगार झुळूक अंगावर घेत; आळस झटकून दिवसाची सुरुवात होते. प्रातर्विधी आटोपून बाहेर पडता-पडता सूर्याची पहिली किरणे निळंशार आकाश उजळून टाकताना दिसतात. पूर्ण दिवस असा समोर उभा ठाकलेला असतो. अनेक कामं दिसत असतात. तरीही अशी सकाळची हवा सगळं-सगळं विसरायला लावून कौतुक करवून घेते. बंगलोरच्या आकाशाची निळाई काहिशी वेगळीच आहे. आकाशात बहुतेक वेळा पांढुरके ढग आळशीपणाने पहुडलेले दिसत असतात. कदाचित त्यामुळेच निळा रंग आणखीनच गहिरा वाटत असावा. IISc तली असंख्य झाडेही मग मनसोक्त डोलून सकाळच्या हवेचा आनंद लुटतात. सूर्य हळूहळू वर येत असतो : मनातले विचारही त्याबरोबर निबर होण्यास सुरुवात होते.

फ़ेब्रुवारी महिना वसंत रुतुची खबर घेउन येतो. आंब्याची झाडं मोहरतात. आसमंत मोहोराच्या तीव्र गंधाने भरून जातो. कुठे कोकिळा , कुठे भारद्वाज डोकं वर काढून दिमाखात फिरताना दिसतात. सध्या इथे festival of colours चालू आहे असं म्हणेन. गुलाबी - पिवळा आणि जांभळा अशा तीन रंगांनी IISc चा ताबा घेतलेला आहे. प्रत्येक झाडाने आपली कक्षा आखून घेतलेली आहे. फुलांचा सडाही कसा शिस्तित तिथे पडतोय! खोडकर वारा मात्र ही शिस्त मोडून चहूकडे रंग mix करण्याच्या उद्योगात आहे. या बहराच्या मोसमातदेखील काही झाडांची पानगळ अजून सुरुच आहे. सगळीच झाडं वेळा पाळतात असं नाही! गेल्या दोन महिन्यांतल्या पानगळीमुळे शिरीष-कुसुमाची झाडं कशी उदास दिसत होती - एक दिवस असा येतो - झाडांवर नजर पडते आणि वा! - नव्या हिरव्या पालवीने झाडाचा पूर्ण 'काया'पालट केलेला दिसतो. हिरवा शालू नेसून सजलेल्या नववधूचा तजेला झाडाच्या कांतीवर परततलेला असतो. आता अजून महिना - दोन महिन्यांत गुलाबी - पिवळा - जांभळा या तीन रंगांबरोबर लाल रंगाचा उत्सव सुरु होईल. गुलमोहोर फुलेल. तप्त उन्हात हा अजब तांबडा रंग मात्र डोळ्यांना गारवा देउन जातो - देवेन्द्रच्या म्हणण्याप्रमाणे 'सारंग' मधला कोमल निषाद जसा सुखावून जातो; अगदी तसाच.

निसर्गाची रंगपंचमी अशा तर्हेने सुरु झालेली आहे. रोजच्या routine मध्ये असे background colours असतात; नसतात असे नाही - पण आपल्याला दिसत नाहीत. IISc मध्ये मात्र हे रंग पावलोपावली आपले लक्ष वेधून घेतात. क्षणभर डोळे भरुन बघायला भाग पाडतात. मन असं रंगात न्हाउन निघालं की कसं स्वच्छ-शांत होतं. कामाचे विचार डोक्यात पुन्हा गर्दी करु लागतात. झाडावरची गुलाबी फुलं अजून एक मन - क्षणभर का होईन - जिंकल्याच्या आनंदात आणखीनच गुलाबी होतात...

No comments: