Assignments आणि परिक्षांच्या विचारांनी माझ्या मनातल्या इतर विचारांची चांगलीच जमावबंदी केलेली होती. या अवस्थेतही पुढचा मागचा कोणताही विचार न करता मी Chowdiah Hall चा रस्ता धरला ---
केवळ नशिब बलवत्तर म्हणूनच मला आत जायची संधी मिळाली. स्थानापन्न होतो-न-होतो तोच पडदा बाजूला सारला गेला आणि मंच समोर दिसला. उस्ताद राशिद खान साहेब आणि त्यांचे संगतकार विनम्रपणे अभिवादन करत होते - माझा आनंद कुठेच मावत नव्हता!
तंबोर्याचे धीर-गंभीर सा-प-सा संपूर्ण गाभार्यात दरवळू लागले. पेटीचा सा लागला - तबल्यावर थाप पडली - स्वरमंडलाचे नाजूक स्वर किणकिणले - उस्ताद सज्ज झाले - राग "श्री" ने श्रीगणेशा झाला. भारदस्त आणि सुस्पष्ट आवाज मनाच्या अपुर्या memory त साठवण्याचा मी तोडका-मोडका प्रयत्न करू लागलो. एकतालाची लय हळुहळू वाढत गेली - पावसाचा जोर वाढू लागला. मॆफल रंगू लागली - श्रोत्यांच्या माना डोलू लागल्या - पावलांनी नकळत समेशी संगत केली...
शास्त्रीय संगीत मला नेहमीच एका वेगळ्या जगात घेउन जाते. तानांच्या swiftness ची नशा चढते - विचारांची साखळी कधीकधी जशी एकामागून एक जुळत जाते - तशाच या ताना असतात. एकदा विचारांना धार चढली की त्या बळावर अमर्याद भरार्या माराव्यात. आवाज तापला की ताना घारीच्या सहजतेने उंच भरार्या मारतात - क्षणात खालच्या स्वरांवर झडप घालून पुन्हा उंचावतात.
त्याचप्रमाणे सरगम मला वेड लावून जाते. कविता सुचावी - शब्द चपखल बसावेत - तशी ही सा रे ग म ची सरगम फुलून येते. तालाशी स्पर्धा करत स्वरांना सापासारखे नागमोडी वळण लावत सप्तकांचे डोंगर बघताबघता पार होतात. त्यानंतरची द्रुत बंदिश तर काय वर्णावी! सूरांना पूर येतो - भारावलेली मनं त्या पुराच्या प्रवाहात वाहून जातात - एका अवर्णनीय समाधानाच्या सागराकडे . मी सगळे बंध झुगारुन देतो - मनाला लाभलेल्या त्या हव्याहव्याश्या शांततेला जपून ठेवण्याचा प्रयत्न करतो. ही शांतता मग मला पुरून उरते - assignments - परिक्षांचे tension कुठच्या कुठे पळून जाते - विश्वासाच्या व्रुक्षाला नवे खत-पाणी आणि आपुलकीचा स्पर्श मिळालेला असतो. "वा! उस्ताद क्या बात हॆ" अशी मनापासून दाद देत मी उठतो. संपूर्ण सभाग्रुहाचा ताबा आता टाळ्यांच्या कडकडाटाने घेतलेला असतो. माझ्यासारख्या छोट्या रसिकाच्या टाळ्यांचा आवाजही त्या गजरात सामावून जातो - टाळ्यांच्या आवाजाहूनही जास्त परिणामकारक अशा समाधानाची आणि appreciation ची पावती त्या एकंदरीत वातावरणातून उस्तादांपर्यंत पोहोचते. भारावलेल्या मनःस्थितीत आणि वेड लावणार्या सूरांच्या देणगीबरोबर मी परततो - एक वेगळाच अजित बनून!
No comments:
Post a Comment